हृदयद्रावक! शेतीच्या वादातून जन्मदात्या आई-वडिलांनाच संपवले; लाकडाने वार करून केली हत्या; चिखली तालुक्यातील किन्ही सवडत येथील घटना...
Sep 29, 2025, 12:29 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जमिनीच्या वादातून जन्मदात्या आई वडिलांनाच मुलाने संपवल्याची हृदयद्रावक घटना चिखली तालुक्यातील किन्ही सवडत येथे २७ सप्टेंबर रोजी घडली.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलास अटक केली आहे. केवळ पाच एकर शेतीच्या हिस्स्याच्या वाटणीसाठी अडसर असल्याच्या तुच्छ कारणामुळे एका नराधम मुलाने आपल्या वयोवृद्ध आणि असहाय्य आई-वडिलांना ठार मारले.
किन्ही सवडद येथील गणेश महादेव चोपडे (वय ३८ वर्षे) यांनी आपल्या वडील महादेव त्र्यंबक चोपडे (७५ वर्षे) आणि आई कलावतीबाई महादेव चोपडे (७० वर्षे) यांना वारंवार शेतीच्या हिस्स्यावाटणीसाठी तगादा लावला होता. आयुष्याच्या संध्याकाळी असलेल्या या वयोवृद्ध पालकांचा आधार बनण्याऐवजी, गणेश सातत्याने त्यांना त्रास देत होता.
२७ सप्टेंबरच्या सायंकाळी त्याने पुन्हा आई-वडिलांशी या विषयावरून वाद उकरून काढला. रागाच्या भरात त्याचे पाऊल माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडून गेले. त्याने हातात बाजीचा लाकडी ठावा घेऊन ७०–७५ वर्षांच्या वयोवृद्ध आई-वडिलांवर क्रूर प्रहार केला आणि त्यांना जिवाने ठार केले.
घटनेची माहिती मिळताच अमडापूर ठाणेदार निखिल निर्मळ यांनी घटनास्थळी सहकाऱ्यांसह धाव घेतली. बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनीही घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
या घटनेत आरोपी गणेश चोपडे यास अटक करण्यात आली असून, भारतीय दंड संहितेच्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार निखिल निर्मळ करत आहेत.