भरधाव इको कार व दुचाकीची समोरासमोर धडक; दोन जण ठार, एक गंभीर; ब्राम्हण चिकना गावाजवळील घटना; खापरखेड घुले येथील मृतक...
Dec 22, 2025, 09:24 IST
बीबी (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भरधाव इको कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना बीबी–सुलतानपूर महामार्गावर बीबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्राह्मण चिकना गावानजीक 20 डिसेंबर रोजी घडली. गजानन सुभाष घुले (वय २०) रा. खापरखेड घुले व अन्य एक जण या अपघातात ठार झाले आहेत.
बीबीपासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्राह्मण चिकना गावाजवळ दि. २० डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोटरसायकल क्रमांक एमएच २८ बीझेड ०६३३ व इको कार क्रमांक एमएच २८ बीडब्ल्यू ५९३८ यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात गजानन सुभाष घुले (वय २०) याचा जागीच मृत्यू झाला. तसे जखमी विलास चव्हाण व एका अनोळखी व्यक्तीस उपचारासाठी जालना येथे नेत असताना त्यापैकी एकाचा रस्त्यातच मृत्यू झाला. तिसरा जखमी गंभीर अवस्थेत असून त्याच्यावर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील इको कार चालकाचे नाव व गाव अद्याप समजू शकले नसून, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४ व १७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अर्जुन सांगळे करीत आहेत.
