घरफोडी करून पळत होता... पण नियतीला ते मान्य नव्हतं! शेगावात झाडाला धडकली चोरट्याची कार, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

 

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रात्रीच्या अंधारात घरफोडी केली, मुद्देमाल गाडीत टाकला आणि गाडी भरधाव पळवली... पण गुन्ह्याच्या प्रवासाचा शेवट कुठे होणार हे कोणाला ठाऊक? शेगावमध्ये चोरट्याच्या गुन्हेगारी प्रवासाचा अंत अपघाताने झाला, तोही थेट पोलिसांच्या हातात!

शेख अहेमद शेख समद (३६, रा. आरास लेआउट, बुलढाणा) या नामांकित गुन्हेगाराने आपल्या साथीदारांसोबत २८ एप्रिल रोजी शेगाव शहरातील कमलसिंग परिहार आणि देवलाल ढगे यांच्या घरांचे कुलूप तोडले. घरफोडी करून तो आपल्या MH 48 BH 1205 क्रमांकाच्या टाटाच्या टिगोर कारने पळून जात होता. पण नियतीने वेगळाच डाव खेळला, कार थेट झाडावर आदळली. अपघातात गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या आरोपीला शेगाव पोलिसांनी गाठलं आणि शेख अहेमदला ताब्यात घेतलं. त्याचे साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेत फरार झाले.

पोलीस सूत्रांनुसार, आरोपीकडून, टाटा टिगोर कार, नगदी १५,००० रुपये, घरफोडीचे औजार असा एकूण ९,८६,२५० रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तपासादरम्यान शेख अहेमदने ६ घरफोड्यांची कबुली दिली आहे, ज्यामुळे परिसरातील अनेक प्रलंबित गुन्ह्यांवर प्रकाश पडला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोउपनि कुणाल जाधव, तसेच पोलीस कर्मचारी गणेश वाकेकर, गजानन वाघमारे, संतोष गवई, निलेश गाडगे यांनी केली.