लघुशंकेला थांबला अन् क्षणात बॅग पळवली;मलकापूरात धक्कादायक लूट! दोन दुचाकीस्वारांनी व्यापाऱ्याची १.८० लाखांची रोकड केली लंपास...

 
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मलकापूर शहरात लघुशंकेसाठी थांबलेल्या  व्यापाऱ्याची रोकड हिसकावून दोघांनी पळ काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दोन आरोपी विरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अरुणकुमार राजमल बेहेडे (वय ५७, व्यवसाय – कृषी केंद्र, रा. चाळीसबिघा, बेसन मिलजवळ, मलकापूर) हे आपल्या बेहेडे ट्रेडर्स या कृषी केंद्रातील दिवसभराच्या व्यवहाराची १ लाख ८० हजार रुपयांची रोकड बॅगमध्ये घेऊन घरी जात होते.
१० जानेवारी २०२६ रोजी रात्री ८.२० वाजताच्या सुमारास, चाळीसबिघा जुन्या गार्डनजवळ ते लघवीसाठी थांबले असता, अचानक पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेल्या एका इसमाने त्यांच्या दुचाकीला अडकवलेली पैशांची बॅग हिसकावली.

बॅग चोरणारा इसम थोड्याच अंतरावर उभी असलेल्या  दुचाकीवर बसलेल्या दुसऱ्या साथीदारासह दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाला. काही क्षणातच दोघेही अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या घटनेत फिर्यादींच्या बॅगमधील १,८०,००० रुपये रोख असा मोठा ऐवज लुटला गेला आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

या प्रकरणी दोन्ही चोरट्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वारे करीत आहेत.
सीसीटीव्ही फुटेज, दुचाकीचा माग काढणे तसेच आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.