पायऱ्यांवर बसून अंघोळ करत होता; पाय घसरून पाण्यात पडला!पुर्णा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू! ३ दिवसांनी सापडला मृतदेह; मलकापूर तालुक्यातील घटना

 
 मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): धोपेश्वर येथे पूर्णा नदीच्या पायऱ्यावर बसून आंघोळ करणारा युवक पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला. ३० मार्चला ही घटना घडली. दरम्यान घटनेच्या ३ दिवसांनी तरुणाचा मृतदेह सापडला आहे..
धरणगाव येथील युवक योगेश सुधाकर कवळे व त्याचा मावसभाऊ सुरज वासुदेव कवळे हे दोघे मोटारसायकलने धोपेश्वर येथे पूर्णा नदीपात्रामध्ये आंघोळीसाठी गेले होते. योगेश कवळे हा पायऱ्यावर बसून आंघोळ करीत होता. त्याचवेळी घसरून तो पाण्यात बुडाला. तो वर न आल्याने मावसभाऊ सुरज घाबरून घरी निघून गेला. काही वेळाने नावाडी सुभाष कहाते (हरसोडा) याने पायऱ्यावर पडलेले मोबाइल, कपडे, चप्पल व पाचशे रुपये दिसले. मोबाइल वरील फोटो पाहून पोलीस पाटील जितेंद्र पाटील यांना फोन करून सांगितले. पोलीस पाटलांनी लगेच दसरखेड एमआयडीसी पोलिसांशी संपर्क केला. चार ते पाच लोकांना घेऊन पूर्णा नदीपात्रात पाण्यामध्ये शोध घेतला. परंतु पाण्याची पातळी खोल असल्याने योगेश सापडला नाही. ३१ मार्चला एमआयडीसी पोलीस निरीक्षक हेमराज कोळी आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचले. तर बुलढाणा येथून एनडीआरएफची टीमही दाखल झाली. 
  शोधाशोध करूनही योगेशचा पत्ता लागला नाही. दरम्यान, १ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास योगेशचा मृतदेह पाण्यावर तरंगत दिसला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास दसरखेड एमआयडीसीचे पोलीस अंमलदार राजेश बावणे करीत आहेत.