रात्री अंडी घेऊन निघाला अन् काही क्षणांतच रक्ताच्या थारोळ्यात! बुलढाण्याजवळच्या मोठ्या साखळीत नेमकं घडलं तरी काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साखळी बु. येथील पंकज रवींद्र लंवगे (वय ३१) यांनी याबाबत तक्रार दिली. त्यांचा भाऊ अंकुश रवींद्र लंवगे (वय २८) हा बुधवारी रात्री सुमारे ९ वाजता दुचाकीवर अंडी घेऊन जात होता. त्यावेळी गावातील प्रथमेश जांलीदर हिवाळे याने जुन्या भांडणाच्या कारणावरून अर्बन परिसरातील रस्त्यावर त्याला अडविले.आरोपीने प्रथम अंकुशच्या दुचाकीला लाथ मारून त्याला खाली पाडले. याचा जाब विचारताच आरोपीने शिवीगाळ करत धमकी दिली आणि जवळील चाकूने अंकुशच्या मांडीवर वार केला. या हल्ल्यात अंकुश गंभीर जखमी झाला.
ही घटना पाहून पंकज लंवगे हे भांडण सोडविण्यासाठी पुढे गेले. मात्र, झालेल्या झटापटीत त्यांच्या डाव्या हातालाही दुखापत झाली. तसेच आरोपीने दुचाकीला लाथ मारल्याने वाहतूक केली जात असलेल्या अंड्यांचेही नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.जखमी अंकुश लंवगे याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, पंकज लंवगे यांच्या तक्रारीवरून बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी प्रथमेश जांलीदर हिवाळे याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.