घरातून दुचाकीवर निघाला अन् थेट शेतात पोहोचला; विहिरीजवळ चप्पल-मोबाइल सापडले, २० वर्षीय दीपकचा मृतदेह आढळल्याने खळबळ!

 
 संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : टुनकी येथील २० वर्षीय युवकाचा पांचाळा शेतशिवारातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. दीपक संजय झामरे असे मृतक युवकाचे नाव आहे. दीपक हा १८ सप्टेंबर रोजी सकाळपासून दुचाकीवरून घरातून निघून गेला होता. बराच वेळ उलटूनही तो घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी गावासह परिसरात त्याचा शोध सुरू केला.

शोध घेत असताना पांचाळा येथील शेतशिवारात एका नातेवाईकाला शेताच्या धुऱ्यावर दीपकची दुचाकी आढळून आली. त्यानंतर विहिरीजवळ पाहणी केली असता तेथे दीपकची चप्पल आणि मोबाइल आढळून आले. त्यामुळे विहिरीत शोध घेतला असता दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास दीपकचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढून पोलिसांनी पंचनामा केला.

याप्रकरणी मृतकाचे नातेवाईक गजानन प्रल्हाद झामरे यांच्या तोंडी रिपोर्टवरून तामगाव पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार गाडे पुढील तपास करीत आहेत.