प्रियकराची हत्या करून मृतदेह फेकला गाेदावरी नदीत; आराेपी फरार प्रेयसीस साखरखेर्डा येथून अटक..!
Aug 20, 2025, 12:38 IST
साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :छत्रपती संभाजी नगर येथे प्रेयसीने प्रियकराचा खून करून मृतदेह पैठण येथील पुलावरून गोदावरी नदीत फेकून दिला होता. तेव्हापासून फरार असलेल्या आरोपी प्रेयसीस अहिल्यानगर गुन्हे शाखेच्या पथकाने साखरखेर्डा येथील एका शेतातून अटक केली.सचिन पुंडलीक औताडे असे मृतक प्रियकराचे नाव आहे.
सचिन पुंडलिक औताडे (वय ३२) यांचे ३४ वर्षीय महिलेसाेबत प्रेमसंबंध होते. मात्र, सदर महिलेचे इतरांशीही संबंध असल्याने सचिन आणि तिच्यात वारंवार वाद होत होते.३१ जुलै रोजी सचिन आणि प्रेयसी जालना येथे एका विवाहसोहळ्यासाठी आले होते. त्यानंतर दोघे छत्रपती संभाजीनगर येथे गेले. त्याच रात्री प्रेयसीने आपल्या नातेवाईक दुर्गेश मदन तिवारी आणि अफरोज खान यांच्या मदतीने सचिनचा खून केला. मृतदेह प्लास्टिकच्या ताडपत्रीत गुंडाळून पैठणजवळील गोदावरी नदीच्या पात्रात फेकण्यात आला.
नंतर शेवगाव तालुक्यातील मुंगी गावालगत सदाशिवराजे भोसले यांच्या शेताशेजारील गोदावरी नदीच्या पात्रात मृतदेह आढळून आला. शेवगाव पोलिसांनी बेवारस म्हणून मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून दफनविधी केला होता. या अगोदर सचिनचे वडील पुंडलिक औताडे यांनी हसूल पोलीस ठाण्यात सचिन घरातून निघून गेल्याची तक्रार केली होती. त्यानंतर सचिनचा भाऊ यांची सचिनचा मित्र प्रशांत रमेश महाजन यांच्याशी भेट झाली. त्याने ३१ जुलै रोजी संध्याकाळी सचिन प्रेयसीच्या गाडीत जालना येथे गेला होता, असे सांगितले.
यामुळे प्रेयसीवर संशय आला आणि पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. अफरोज खान यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने सचिनचा खून झाल्याचे आणि मृतदेह फेकल्याचे उघड केले. तसेच प्रेयसी आणि दुर्गेश तिवारी हे साखरखेर्डा येथील एका तिवारी नामक नातेवाईकांकडे असल्याचे सांगितले. अहिल्यानगर येथील गुन्हे शाखेचे पथक १८ ऑगस्ट रोजी साखरखेर्डा येथे आले. त्यांनी तांदुळवाडी शिवारातील एका शेतातून प्रेयसीसह दुर्गेश मदन तिवारी या दोघांना ताब्यात घेतले.या घटनेने खळबळ उडाली आहे.