आश्रमशाळेत नुकताच दाखल झाला होता... पण सायंकाळी घडलं असं काही की संपूर्ण गाव हादरलं! जळगाव जामोद तालुक्यातील घटना
मोहित अनिल वाकुडकर (वय ११, रा. धानोरा महासिद्ध) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो आश्रमशाळेत पाचवी इयत्तेत शिक्षण घेत होता. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच त्याचा आश्रमशाळेत प्रवेश झाला होता. नव्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्याच्यावर काळाने घाला घातल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी मोहित शौचालयासाठी बाहेर गेला होता. यावेळी पाण्याजवळ त्याचा तोल जाऊन तो घसरल्याने पाण्यात बुडाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील युवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मोहितला पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी नांदुरा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.दरम्यान, या घटनेबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे या प्रकरणावर शाळा प्रशासनाची अधिकृत भूमिका वृत्त लिहिपर्यंत समोर आलेली नव्हती.