हात पकडला आणि म्हणे लग्न कर.. नाहीतर घरच्यांना जीवे मारतो! मोताळ्यात नेमकं काय घडलं

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लगीन सराई सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात तरुणी बेपत्ता होण्याच्या घटना वाढत आहेत. याशिवाय लग्नासाठी जबरदस्ती करणे, विनयभंग करणे अशा घटना देखील समोर आल्या आहेत. "जी माझी होऊ शकत नाही,ती कुणाचीच होऊ देणार नाही" या विकृत विचार ट्रेडिंगवर असल्याने गुन्हे वाढत आहेत. मोताळा तालुक्यातील एका गावात अशीच धक्कादायक घटना घडली.एका २० वर्षीय तरुणीला विकृत तरुणाकडून लग्नासाठी जबरदस्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर त्याने तरुणीच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटना मोताळा तालुक्यातील एका गावातील आहे. पीडित तरुणीचे वय २० वर्षाचे आहे. घटनास्थळ बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येते. गावातील पाण्याच्या टाकीजवळ किरण ज्ञानदेव सातव या आरोपीने तरुणीचा वाईट उद्देशाने हात पकडला." तू माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर तुला व तुझ्या घरच्यांना जीवाने मारून टाकील" अशी धमकी तरुणाने तरुणीला दिली. तरुणीने कशीबशी तरुणाच्या तावडीतून सुटका करून घेतली. घडला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर बोराखेडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार देण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी आरोपी किरण सातव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास बोराखेडी पोलीस स्टेशनचे पोहेकॉ श्रीकांत चिटवार करीत आहेत.