शेगावात मोबाईल हॅक करून खात्यातून ९९ हजारांची ऑनलाइन परस्पर रक्कम ट्रान्सफर; झुडियो मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेल्या व्यक्तीला फटका

 
 शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : झुडियो मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेल्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये छेडछाड करून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ९९ हजार ८९९ रुपये ऑनलाइन परस्पर ट्रान्सफर केल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी शेगाव येथे घडली. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज गंगाधर खुंटे (वय ४७, रा. ब्रम्हांडनायक नगर, बुलडाणा) हे पत्नीसमवेत शेगाव येथील झुडियो मॉलमध्ये खरेदीसाठी गेले होते. यावेळी त्यांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल अचानक गरम होऊन बंद पडला. सुमारे दहा मिनिटांनंतर मोबाईल पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यांनी खरेदी केलेल्या कपड्यांचे ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी फोनपे ॲप उघडले.

दरम्यान, त्यांना आपल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून सायंकाळी ५ वाजून १४ मिनिटांनी फोनपेच्या माध्यमातून ९९ हजार ८९९ रुपये अनोळखी खात्यावर ट्रान्सफर झाल्याचे निदर्शनास आले. आपण कोणताही व्यवहार केलेला नसतानाही खात्यातून एवढी मोठी रक्कम वजा झाल्याचे लक्षात आल्यानंतर ऑनलाइन फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

अज्ञात व्यक्तीने मोबाईलमध्ये छेडछाड करून बँक खात्यातील रक्कम परस्पर वळती केल्याचा संशय व्यक्त करत मनोज खुंटे यांनी शेगाव शहर पोलिसांत लेखी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी कलम ३१८(४) बीएनएस तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(सी) आणि ६६(डी) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, ऑनलाइन व्यवहाराच्या माध्यमातून ही रक्कम नेमकी कोणत्या खात्यात वळती करण्यात आली, तसेच मोबाईलमध्ये नेमकी कोणत्या पद्धतीने छेडछाड करण्यात आली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलीस निरीक्षक निमीष मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.