मोकाट कुत्र्यांनी उकरून काढला बालिकेचा मृतदेह; मेहकर हादरलं! जानेफळ रोडवरील हृदयद्रावक घटना; पोलिसांची तत्काळ पाहणी, नागरिकांत हळहळ...

 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील जानेफळ रोड परिसरात शुक्रवार सकाळी एक हृदयद्रावक प्रकार समोर आला. आजारपणामुळे मृत झालेल्या दीड वर्षांच्या बालिकेचा मृतदेह अंत्यविधीनंतर मोकाट कुत्र्यांनी उकरून बाहेर काढल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात दुःख आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जानेफळ रोडवरील महानुभाव पंथ मंदिराजवळील मोकळ्या जागेत काही कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यापैकी एका फिरस्ती कुटुंबातील बालिकेचा काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे मृत्यू झाला होता. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पालकांनी पारंपरिक पद्धतीने जवळच बालिकेचा दफनविधी केला होता. मात्र खोदलेला खड्डा पुरेसा खोल नसल्याने मोकाट कुत्र्यांनी तो उकरून मृतदेह बाहेर काढला आणि त्याचे लचके तोडले.

शुक्रवारी सकाळी नागरिकांनी मंदिराजवळ रस्त्यावर मानवी अवयवांचे तुकडे पडलेले पाहून पोलिसांना माहिती दिली. तत्काळ मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. चौकशीत बालिकेचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचे पालकांनी कबूल केले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला असून, पालकांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे, ठाणेदार व्यंकटेश आलेवार आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. या हृदयद्रावक घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व हळहळ व्यक्त होत आहे.