घाटनांद्रा गाव शोकसागरात! भीषण अपघातात पती पत्नीसह मुलाचा मृत्यू! चिखली – मेहकर रस्त्यावर मुंगसरी फाट्यावर झाला अपघात! एकाच वेळी पेटणार ३ चिता
Jun 4, 2025, 17:55 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली मेहकर रस्त्यावरील मुंगसरी फाट्यावर आज,४ जूनच्या दुपारी साडेतीनच्या सुमारास काळीज पिळवटून टाकणारा अपघात झाला. ट्रक, डस्टर कार यांच्या धडकेत दुचाकी मध्ये सापडली..दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला, दुचाकीवर असलेल्या महिलेचा आणि मुलाचा घटनास्थळीच तर दुचाकी चालकाचा दवाखान्यात पोहोचताच मृत्यू झाला. मृतकांमध्ये बुलढाणा तालुक्यातील घाटनांद्रा गावातील गायकवाड कुटुंबातील पती पत्नी आणि मुलाचा समावेश आहे..
गणेश यादव गायकवाड (४५), लक्ष्मी गणेश गायकवाड (४०) आणि कृष्णा गणेश गायकवाड (१५) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. मूंगसरी फाट्याजवळ हा तिहेरी अपघात झाला. ट्रक, डस्टर कार आणि प्लॅटिना कंपनीची दुचाकी अशा या तिहेरी अपघातात दुचाकीवरील आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या गणेश गायकवाड यांना चिखली येथील जवंजाळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टर आणि त्यांना मृत घोषित केले. अपघातात जखमी झालेल्या इतरांवर देखील उपचार सुरू आहेत.. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
या दुर्दैवी घटनेमुळे बुलढाणा तालुक्यातील घाटनांद्रा गावावर शोककळा पसरली आहे. एकाच वेळी गावात तिघांच्या चिता पेटणार ही कल्पना देखील काळीज सुन्न करणारी आहे...