चिखली पंचायत समितीत लुटारूंची टोळी? किन्होळ्यात सिंचन विहिरींच्या कामात भ्रष्टाचार! विहिरींच्या कामाशिवाय बिले काढली; घरकुलासाठीही पैशांची मागणी!

 तक्रारी येऊनही चिखलीच्या बिडीओंकडून रोजगार सेवकावर मेहरबानी! वाटा मिळतोय काय?
 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एकदा खाण्याची सवय लागली की अधिकारी, कर्मचारी काहीही खातात.. खातांना त्यांना जराशीही लाज वाटत नाही..जसा काही त्यांचा जन्मच खाण्यासाठी झालाय.. खातांना एकमेकांना सहकार्य करायचं, तू माझ्याकडे पाहू नको, मी तुझ्याकडे पाहत नाही..मस्त चुरून हाणू अशी काही खादाड अधिकाऱ्यांची वृत्ती असते.. चिखलीच्या पंचायत समितीतही अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये ही वृत्ती बळावत आहे.. टेबलाखालून रक्कम सरकवल्याशिवाय कामच होत नाही अशा अनेकांच्या तक्रारी आहेत..पंचायत समिती ही तशी गावगाड्यातल्या सामान्यांसाठी असलेली संस्था.. पण सर्वसामान्यांना लुटण्याचे काम पंचायत समितीत साखळी पद्धतीने सुरू आहे. तालुक्यातल्या अनेक गावात घरकुलांसाठी विशिष्ट रकमेची मागणी होते, ग्राम रोजगार सेवकही गाव पातळीवर त्याचा कार्यक्रम बरोबर राबवतो.. "मला काही नको, सायबांच करून द्या लागते" अशी अनेकांची भाषा असते.. किन्होळ्याचा ग्रामरोजगार सेवक वसंता जाधवही तसाच.. गावकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कोणतेही काम करण्यासाठी पैशाची मागणी  रोजगार सेवकाकडून होते.. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे झालेली असून काही कामांमध्ये लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ न देता केवळ निधी काढण्याचे काम या ग्रामरोजगार सेवकाने केले. सिंचन विहिरींच्या कामातही मोठा घोळ केला.. कोणतेही खोदकाम न करता बिले काढण्यात आली..असे एक नव्हे अनेक आरोप झालेत.. गावकऱ्यांनी चिखली पंचायत समितीच्या बीडीओंकडे तक्रारी दिल्या..मात्र बीडीओंनी का मेहरबानी दाखवली हे कळायला मार्ग नाही. बीडीओ"वाघ"भ्रष्टाचारांची शिकार करायला का मागे पुढे पाहतात? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

विशेष म्हणजे किन्होळ्याच्या ग्रामस्थांनी पुराव्यानिशी तक्रारी केल्या आहेत. २१ मे रोजी एक तक्रार बीडीओ वाघ यांच्याकडे करण्यात आली. किन्होळ्यात राहुल बाहेकर, युनुसखा पठाण, सविता अजबराव जाधव , सुखदेव पुंडलिक बाहेकर या लाभार्थ्यांच्या शेतात कोणतेही विहीर खोदकाम,  बांधकाम न करता त्यांची बिले काढण्यात आली. शासनाची दिशाभूल करून पैसे हडपण्यात आले..मात्र बीडीओ वाघ यांनी कारवाई काय साधी चौकशीही केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. विशेष म्हणजे २१ मे रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर २७ मे रोजी लाभार्थ्यांच्या शेतात ग्राम रोजगार सेवकांनी परस्पर जेसीबी पाठवून गड्डे खोदले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ज्यांनी खोदकाम,बांधकाम केले त्यांना काहीच नाही..

याउलट सिंचन विहीर योजनेअंतर्गत २०२४ –२०२५ मध्ये विहिरीचे काम पूर्ण झाले असतानाही आजपर्यंत एकही बिल काढण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. किंवा येथील सुनिता पांडुरंग पाटील यांच्या विहिरीचे सिंचन विहीर योजनेअंतर्गत पूर्ण काम झाले,मात्र ग्रामरोजगार सेवकाने लाभार्थ्यांचे बिल काढले नाही..उलट काही प्रकरणात मात्र काम न करता पैसे उकळले..! 

खूप खातो रोजगार सेवक..

एवढ्यावरच ग्रामरोजगार सेवक थांबत नाही.. गावातील अनेक प्रकरणांमध्ये त्याने पैशाची मागणी केल्याचा आरोप आहे. गावातील घरकुल योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांची कामे पूर्ण झाली असतानाही त्यांना मनरेगा अंतर्गत मिळणारे अनुदान मिळाले नाही. काही प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांच्या नावावरील निधी रोजगार सेवकाच्या निकटवर्ती यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचा गंभीर प्रकारही समोर आला आहे..मात्र एवढे होऊन बीडीओ वाघ कारवाई करायला तयार नाहीत. रोजगार सेवकाच्या वसुलीत बीडीओंचाही काही वाटा आहे का? असा संशयास्पद सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे..त्यामुळे संशयाचे मळभ दूर करण्यासाठी बीडीओ वाघ यांनी ग्रामरोजगार सेवकावर कारवाई करणे आवश्यक आहे...