सोन्याचे बनावट शिक्के देऊन फसवणूक; देऊळगाव राजात दोघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

 

देऊळगावराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सोन्याचे बनावट शिक्के देऊन फसवणूक करणाऱ्या दोघा आरोपींना देऊळगाव राजा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवानंद बबन पवार व विजय भोसले (दोघेही रा. दुसरबीड) अशी या आरोपींची नावे असून त्यांनी मोहित मनोज कुमार पांडे (रा. उत्तर प्रदेश) यांची फसवणूक केली आहे.
ही घटना 27 मे रोजी देऊळगाव राजा बस स्थानक परिसरात घडली. आरोपींनी मोहित पांडे यांच्याशी १२ हजार रुपयांत दोन सोन्याचे शिक्के विकण्याचा सौदा केला. मात्र व्यवहारानंतर पांडे यांना संशय आल्याने त्यांनी शिक्क्यांची पडताळणी केली असता, ते सोन्याचे नसून पितळीचे असल्याचे स्पष्ट झाले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोहित पांडे यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.