सीआरपीएफमध्ये नाेकरीचे आमीष दाखवून फसवणुक; एकाविरुद्ध गुन्हा दाखल; तब्बल आठ लाख ६० हजार रुपये उकळले; आराेपी कर्नाटकातील !

 
 देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : डीआयजीचा स्वीय सहायक असल्याचे सांगून खाेटे नियुक्तीपत्र आणि निवडयादी दाखवून बायगाव खुर्द येथील सुशिक्षीत बेराेजगार युवकाची ८ लाख ६० हजार रुपयांनी फसवणुक केल्याचे समाेर आले आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी आकाश श्रीकृष्ण बोरकर (वय २१, रा. बायगाव खुर्द, ता. देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राहुल गणपती जाधव (रा. कलखोरा, ता. बसवा कल्याण, जि. बिदर, कर्नाटक, सध्या रा. ठाणे) याने स्वतःला सीआरपीएफ जवान आणि बेलापूर, मुंबई येथील विभागातील डीआयजी अधिकाऱ्यांचा स्वीय सचिव असल्याचे सांगत आपल्याला फसवले.
पुण्यात सीआरपीएफ भरती सुरू असल्याचे सांगून तुला नोकरी मिळवून देतो; परंतु त्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल, असे आमिष दाखवण्यात आले.
आरोपीने फिर्यादीच्या वडिलांशी संपर्क साधून नोकरी लावून देण्यासाठी पैसे मागितले, आणि त्यांच्या बैंक ऑफ महाराष्ट्र, खार (पश्चिम) शाखेतील खात्यावर टप्प्याटप्प्याने ८ लाख ६० हजार रुपये भरायला लावले. यानंतर आरोपीने खोटे नियुक्तिपत्र आणि निवड यादी तयार करून दिली.
परंतु दीर्घकाळ उलटल्यानंतरही नियुक्ती न झाल्याने फिर्यादीला फसवणुकीचा संशय आला. चौकशीत सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पीआय ब्रम्हा गिरी व पीएसआय हेमंत शिंदे तपास करीत आहेत.