अंढेर्यात चार वर्षीय चिमुकलीचा विजेच्या प्रवाहाने मृत्यू
Aug 18, 2025, 13:26 IST
अंढेरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विजेच्या प्रवाहाचा शॉक लागून चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अंढेरा येथे घडली. ही घटना शनिवारी (दि. १७ ऑगस्ट) दुपारी दोन ते तीनच्या सुमारास घडली. दिव्या विनोद तेजनकर असे मृत मुलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या ही आपल्या घरात लहान भावासोबत खेळत असताना सुरू असलेल्या कुलरला अचानक विद्युत प्रवाह आला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे घरातील भिंती ओलसर झाल्या होत्या. भिंतीवर असलेल्या विद्युत मीटरमधून आलेला प्रवाह ओलसर जागेत पसरल्यामुळे हा अपघात घडल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
घटनेच्या वेळी वडील विनोद तेजनकर हे शेतात कामासाठी गेले होते, तर आई घरगुती कामात व्यस्त होती. अचानक झालेल्या या प्रकारात दिव्याचा मृत्यू झाला, मात्र तिच्यासोबत खेळत असलेला लहान भाऊ बचावला.
विनोद तेजनकर यांना दोन मुली व एक मुलगा असून या दुर्दैवी घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
