"खिशात सापडल्या चार चिठ्ठ्या... पत्नीच्या कथित लफड्याचा धक्कादायक उल्लेख; मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, पत्नी आणि कथित प्रियकरावर गुन्हा!"
अंढेरा येथील खळबळजनक घटना; आत्महत्येपूर्वीच्या चार चिठ्ठ्यांमुळे तपासाला नवे वळण....
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंढेरा येथील सुरज रामभाऊ तेजनकर यांचा विवाह २०२१ मध्ये वंदना ज्ञानेश्वर रिंडे (रा. मोहाडी, ता. सिंदखेडराजा) हिच्याशी झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगी आहे. मुलगी अवघी नऊ महिन्यांची असताना वंदना माहेरी निघून गेली. त्यानंतर तिचे सतीश रामेश्वर काकडे (रा. बोरगाव काकडे, ता. चिखली) याच्याशी कथित प्रेमसंबंध असल्याचा आरोप सुरजच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या कारणावरून पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सुरज पत्नीला फारकत देण्याची मागणी करत होता. दरम्यान, वंदना हिने चिखली पोलिस ठाण्यात सुरजविरुद्ध तक्रारही दाखल केली होती. त्यानंतरही आपल्याला सतत मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे आरोप फिर्यादीत करण्यात आले आहेत.
या सर्व घडामोडींमुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या सुरजने अंढेरा येथील आपल्या काकांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या आईने दिलेल्या फिर्यादीत केला आहे. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी मृताच्या खिशात चार चिठ्ठ्या आढळून आल्या. या चिठ्ठ्यांतील मजकूर तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत असून, पोलिस त्याचा बारकाईने अभ्यास करत आहेत.
या प्रकरणी मृताची आई शशिकला रामभाऊ तेजनकर (वय ६०, रा. अंढेरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वंदना सुरज तेजनकर आणि सतीश रामेश्वर काकडे यांच्याविरुद्ध अंढेरा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ व ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक २४१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय दिनेश घुगे करीत आहेत.