राजूर घाटात विहिरीतून आली दुर्गंधी… आत पाहताच उडाली खळबळ! अनोळखी पुरुषाचा मृतदेह; ‘ॐ’च्या गोंदणावरून ओळख पटविण्याचे आवाहन! आत्महत्या की घातपात?

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):बुलढाणा शहरातील राजूर घाट परिसरातील गुलाबचंद नगरात खळबळजनक घटना समोर आली आहे. एका विहिरीत अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून, बुलढाणा शहर पोलिसांकडून ओळख पटविण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

गुलाबचंद नगरातील बेनीश्याम अग्रवाल यांच्या दुकानाशेजारील विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर विहिरीत पाहणी केली असता पुरुषाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर बुलढाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे आहे. त्याच्या उजव्या हातावर ‘ॐ’चे गोंदण आहे. व्यक्ती टक्कल असलेली असून अंगात निळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट आहे. वर्ण निमगोरा असून उंची अंदाजे ५ फूट ५ इंच असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक ६२/२०२५, कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अन्वये नोंद करण्यात आली आहे.

मृत व्यक्तीच्या वर्णनावरून कोणाला ओळख पटत असल्यास किंवा आपल्या परिचयातील व्यक्ती बेपत्ता असल्यास बुलढाणा शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक एम. जी. वाघमोडे यांनी केले आहे.

राजूर घाट परिसरातील या घटनेनंतर मृत व्यक्ती नेमकी कोण, ती विहिरीत कशी पोहोचली, याबाबत तपास सुरू आहे.