वढव च्या माजी सरपंचाची "हत्याच"! जमिनीच्या वादातून भावकी उठली जीवावर! तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल....
Jun 12, 2025, 08:42 IST
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):– वढव येथील माजी सरपंच अशोक आबाजी सोनुने (वय ६०) यांची जमिनीच्या वादातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लोणार पोलिसांनी तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हिरडव रस्त्यालगत १० जून रोजी आढळलेल्या कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटताच जिल्हाभरात एकच खळबळ उडाली.
१० जून रोजी सायंकाळी ६:४४ वाजता हिरडव रस्त्यावर मापारी गुरुकुल परिसरात एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी तक्रारदार लता अशोक सोनुने (वय ५०, रा. वढव, ता. लोणार) यांना बोलावले. त्यांनी मृतदेह हा त्यांच्या पती अशोक सोनुने यांचाच असल्याचे स्पष्ट केले. मृतदेहाच्या स्थितीवरून आणि पार्श्वभूमी पाहता, हत्या झाल्याचा संशय बळावला.
तक्रारदार लता सोनुने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पतीचे आरोपी कैलास प्रकाश सोनुने, प्रशांत प्रकाश सोनुने आणि संतोष एकनाथ सोनुने (सर्व रा. वढव) यांच्याशी जमिनीच्या मालकीवरून दीर्घकाळ वाद सुरू होता. संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असून, त्यावर दिवाणी न्यायालयात दावा दाखल आहे.
तक्रारानुसार, ११ मे २०२५ रोजी अशोक सोनुने बेपत्ता झाले होते. याबाबत लोणार पोलिसांत तक्रारही नोंदवण्यात आली होती. अखेर १० जून रोजी त्यांचा कुजलेला मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिस निरीक्षक मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धनंजय इंगळे यांनी तातडीने तपास सुरू करत तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला.
माजी सरपंचाच्या हत्येमुळे वढव व परिसरात संतापाचे वातावरण आहे. पुढील तपास लोणार पोलिस करत असून, जमिनीच्या वादातून घडलेल्या या हत्येने पुन्हा एकदा अशा वादांच्या गंभीर परिणामांची चर्चा सुरू झाली आहे.