

फॉलो अप –देऊळगावराजा पोलिस हत्याकांड प्रकरण! पोलीस कोठडीत आरोपींची कसून चौकशी; आरोपींचे बँक स्टेटमेंट तपासणार पोलीस; नवा खुलासा होण्याची शक्यता...
Apr 3, 2025, 12:52 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ३० मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी देऊळगावराजा सिंदखेड राजा रोडवरील आरजे इंटरनॅशनल स्कूलच्या समोरील वन विभागाच्या जागेत ज्ञानेश्वर म्हस्के(३८) नामक पोलीस कर्मचाऱ्यांचा मृतदेह एका स्विफ्ट डिझायर कार मध्ये आढळून आला होता. तपासाअंती ज्ञानेश्वर म्हस्के यांचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले होते.. स्थानिक गुन्हे शाखेसह देऊळगाव राजा पोलिसांनी वेगवान तपास करत याप्रकरणी घटनेच्या दिवशीच गुन्हा दाखल झाल्यानंतर चार तासांच्या आत ४ आरोपींना अटक केली होती. अनैतिक संबंधातून सुपारी देऊन गिरोली खुर्दच्या बाबासाहेब म्हस्के याने हे हत्याकांड घडवून आणल्याचे समोर आले होते. दरम्यान सध्या आरोपी ५ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत आहेत. पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे..या चौकशीतून नवा खुलासा समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय पोलिस आरोपी बाबासाहेब म्हस्के , टायगर यांच्यासह इतर आरोपींच्या बँक खात्यांची देखील तपासणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले..
घटनेचा तपास देऊळगावराजाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम करत आहेत. आज आणि उद्या आरोपींच्या चौकशीतून काही धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी आणखी एखादा आरोपी वाढण्याची शक्यता असली तरी अद्याप तसे ठोस पुरावे पोलिसांना मिळालेले नाहीत. तथापि सुपारी देऊन हे हत्याकांड घडवलेले असल्याने आरोपी बाबासाहेब म्हस्के, टायगर यांच्या बँक खात्यांची तपासणी देखील पोलीस करणार आहेत. सुपारी दिलेली रक्कम हस्तगत करण्यासाठी देखील पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.