पाच वर्षांच्या चिमुरडीवर नराधमाचा अत्याचार; बुलढाण्यात माणुसकी हादरवणारी घटना !

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील हतेडी शिवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामस्थळी पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी २५ वर्षीय परप्रांतीय मजुराला बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी मलकापूर रेल्वे स्थानकावरून अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, पोटी लेकी व पाठी बहिणी असलेल्या प्रत्येकाच्या काळजात भीती निर्माण झाली आहे.

हतेडी शिवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम ‘सॅम इंडिया’ या कंपनीमार्फत सुरू असून, त्या ठिकाणी झारखंड राज्यातील संतोष ब्रिजपाल भोईया (वय २५) हा मजूर कार्यरत होता. २८ जानेवारी रोजी दुपारी, चिमुरडी एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिला झोपडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या अमानुष कृत्यानंतर पीडित मुलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला.

उपचाराऐवजी अपहरण; पळून जाण्याचा प्रयत्न

पकडले जाण्याच्या भीतीने आरोपीने मुलीला तातडीचे उपचार देण्याऐवजी तिचे अपहरण केले व तिला थेट मलकापूर रेल्वे स्थानकावर नेले. तेथून पसार होण्याच्या तयारीत असतानाच बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.

कागदपत्रांशिवाय मजूर; प्रशासनावर प्रश्नचिन्ह

अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे आधार कार्डसह कोणतेही ओळखपत्र नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बांधकामस्थळी काम करणाऱ्या मजुरांची नोंदणी व पडताळणी करणे बंधनकारक असताना, कोणतीही कागदपत्रे न तपासता परप्रांतीय मजूर कामावर ठेवल्याने संबंधित यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायदा आणि अपहरणाचे गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पीडितेची प्रकृती चिंताजनक

अत्याचारामुळे रक्तस्त्राव न थांबल्याने पीडित मुलीला तातडीने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. तेथे तिच्यावर उपचार सुरू असून, तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.