भरधाव काळी पिवळी उलटली, पाच जण गंभीर जखमी; मेहकर ते लोणार मार्गावरील घटना; जखमींवर उपचार सुरू...
Nov 28, 2025, 12:02 IST
लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : प्रवाशी घेवून जाणारी भरधाव काळी पिवळी उलटल्याने पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना २७ नोव्हेंबर नोव्हेंबर रोजी सकाळी लोणार ते मेहकर रस्त्यावर पॉवर हाऊसजवळील वळणावर घडली.
मेहकर–लोणार मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू असून, लोणार बसस्थानक परिसरात पहिला नंबर मिळवण्यासाठी अनेक काळी-पिवळी चालक वेगाने व निष्काळजीपणे वाहने चालवतात. गुरूवारी सकाळीही तीन काळ्या-पिवळ्या वाहनांमध्ये अशीच शर्यत सुरू होती. पॉवर हाऊसजवळील वळणावर पोहोचताच त्यापैकी एका गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन चार पलट्या खात शेजारच्या शेतात जाऊन उलटली. या अपघातात गाडीचा पूर्ण चुराडा झाला असून पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये वैभव विजय मानवतकर (२२), सतिश परमेश्वर पवार (२५) , कार्तिक किसन तेजनकर (१३), रा. वडगाव तेजन ,सतिश नागेश अंभोरे (१३) सर्व रा. वडगाव तेजन व गजानन त्र्यंबक साठे (४०), रा. शारा अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. चालक सतिश पवार याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काळी-पिवळी वाहतुकीवरील पोलिसांचा अंकुश नसल्याने अशा घटना घडत असल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.
