समृद्धी महामार्गावर भरधाव कार कठड्यावर आदळली, पाच जण जखमी; चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला अपघात...
Feb 3, 2026, 19:53 IST
मलकापूर पांग्रा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार कठड्यावर आदळल्याने पाच जण जखमी झाले. ही घटना समृद्धी महामार्गावर 1 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २.२० वाजताच्या चॅनल क्रमांक ३०९.४, मुंबई कॉरिडॉरवर घडला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाहन क्रमांक एमएच-०१-बीयू-९९९५ हे मुंबई कॉरिडॉरच्या दिशेने जात असताना चालक उद्धव लाडेवार (वय ४०) यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे, भरधाव कार महामार्गाच्या बाजुला असलेल्या कठड्यावर आदळली. या अपघातात विजया निमवाड, देवांश लाडेवार, वेदांत लाडेवार, गंगासागर लाडेवार व उद्धव लाडेवार हे पाच जण जखमी झाले. वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे.
जखमींना तातडीने १०८ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने मेहकर येथील सहयोग हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णवाहिका चालक सुभाष पांचाळ, प्रदीप पळघान, तसेच डॉक्टर अशोक पिसे व मंगेश काळे यांनी मदतकार्य केले.
अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला हलवून बॅरिकेटिंग करण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच एपीआय इंगळे, एएसआय खडसे यांच्यासह एमएसएफचे दोन जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, वाहनात डिझेल नसल्याने पोलीस प्रशासनाला रुग्णवाहिकेतूनच घटनास्थळी जावे लागल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती. समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यास सहसा पोलीस प्रशासन तत्काळ मदतकार्याला पोहोचते; मात्र यावेळी रुग्णवाहिकेचा वापर करावा लागल्याने हा प्रकार चर्चेचा विषय ठरला.