सोने लुटणारे पाच दरोडेखोर राजस्थानमधून जेरबंद; जंग जंग पछाडल्यानंतर पोलीस पथकांना यश; लुटलेले अर्ध्याधिक सोनेही जप्त; दोघे सराफांकडे काम करणारे, उर्वरित खासगी चालक..!
२२ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास समृद्धी महामार्गावर मेहकरजवळील फर्दापूर टोल नाक्याजवळ मुंबईतील सोन्याचे व्यापारी अनिल चौधरी यांच्या कारवर हल्ला करून चाकूने वार करण्यात आला होता. तसेच मिरची पूड फेकून कारमधील पाच किलो सोने लुटून दरोडेखोर पसार झाले होते.
मुख्य आरोपी फरारच
लुटीतील प्रमुख आरोपी गमेर सिंग, जो सोन्याच्या व्यापाऱ्याचा चालक होता, अद्याप फरार आहे. त्यानेच व्यापाऱ्याच्या हालचालींची माहिती टोळीला दिल्यामुळे हा दरोडा घालणे शक्य झाले. त्याच्यासह आणखी काही आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक पुन्हा राजस्थानकडे रवाना होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाच पथकाकडून सुरू आहे आरोपींचा शोध
मेहकर पोलिसांची तीन आणि बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची दोन अशी पाच पथके या तपासात गुंतली होती. त्यांनी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सर्च ऑपरेशन राबवले. सुरुवातीला अकोल्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी राजस्थानात जाऊन सलग कारवाई केली आणि एकामागून एक आरोपींना पकडले. आतापर्यंत पाच आरोपी अटकेत असून, या प्रकरणात आणखी दरोडेखोरांचा सहभाग असल्याने आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.