पाच देशी कट्ट्यांसह स्टिल मॅगझिन व १६ जीवंत काडतूसे जप्त; मध्यप्रदेशातील दोन तस्कर अटकेत,सात लाखांचा मुद्देमाल जप्त...

 
 संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : देशी कट्ट्याची तस्करी करणाऱ्या दोघांना सोनाळा पोलिसांनी गजाआड केले. घातक हत्यारे पुरविणारा आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी दोन आरोपीकडून पाच देशी कट्टे,१६ जिवंत काडतूस जप्त केले आहे.या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
 एका चार चाकी वाहनातून घातक हत्यारांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती सोनाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह सापळा रचून टूनकी कडून सोनाळा कडे भरधाव येणाऱ्या एम पी २० सि जी १६९७ या चारचाकी वाहनाला थांबवून झडत घेतली.
यामध्ये ५ स्टील देशी बनावटीचे कट्ट्यांसह स्टिल मॅगझिन, १६ जिवंत काडतुसे, २ अतिरिक्त स्टील मॅगझिन असा एकुण ७ लक्ष ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी मध्यप्रदेशातील चांदामेठा ता . परासिया जिल्हा छिंदवाडा येथील आरोपी मोहम्मद नफीज अकील अली वय २४ वर्षे , मोहम्मद उबेद रजा मोहम्मद अल्फाज वय २१ या दोघांना अटक करण्यात आली आहे.
तर पिस्तूल व जीवंत काडतूसे पुरवणारा अज्ञात शस्त्र माफिया फरार झाला आहे. सोनाळा पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईने संग्रामपूर तालुक्यात‌ पून्हा अग्नी शस्त्रांच्या तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पो. काॅ. राहुल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनाळा पोलिस ठाण्यात आरोपी मोहम्मद नफीज अकील अली, उबेद रजा मोहम्मद अल्फाज, तिसऱ्या अज्ञात आरोपी विरुद्ध कलम भारतीय हत्यार कायदा कलम ३, ७, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मलकापूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांनी सोनाळा पोलीस ठाण्यात भेट देऊन तपासात सूचना केल्या. पुढील तपास सोनाळा पोलीस करीत आहेत.