आधी स्नॅपचॅटवरून धमक्या दिल्या; नंतर केव्हाही घुसायच्या तिच्या घरात; तब्बल ४ महिने करत राहिला अल्पवयीन मुलीचे शोषण; मलकापुरातील असा कसा युवराज?
May 20, 2026, 12:37 IST
मलकापूर (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सोशल मीडियाच्या माध्यमातून धमक्या देत अल्पवयीन मुलीचे शारीरिक व मानसिक शोषण केल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर माध्यमातून आरोपीने अल्पवयीन मुलीला तुझ्या भावाला मारून टाकीन अशी धमकी दिली..त्यानंतर वारंवार तिला धमकावत तिच्या घरात घुसून अत्याचार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून युवराज भातुरकर (वय १९, रा. मलकापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने स्नॅपचॅट अकाउंटवरून पीडित मुलीला वारंवार धमकीचे संदेश पाठवून तिची बदनामी करण्याची तसेच कुटुंबीयांना इजा पोहोचविण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, डिसेंबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत आरोपीने भीतीचे वातावरण निर्माण करून पीडितेचे शारीरिक व मानसिक शोषण केल्याचे नमूद करण्यात आले आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने तिची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अप. क्र. ३८३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच पोक्सो कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश बेले करीत आहेत.