आग्यामोहळाने घेतला जीव! शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर मधमाशांचा हल्ला, ६५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू! एकाने विहिरीत उडी मारून वाचवला स्वतःचा जीव... पळसखेड भट येथील घटना

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तालुक्यातील पळसखेड भट येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. भर उन्हात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर आग्यामोहळाने हल्ला केला. या हल्ल्यात ६५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सोबत असलेल्या मजुराने थरारकरित्या विहिरीत उडी मारून स्वतःचा जीव वाचवला.. काल ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोहम ज्ञानदेव सुरोशे हे सकाळी ११ वाजताच्या सुमारास शेतात काम करत होते. यावेळी अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. शेकडो मधमाशांच्या दंशामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, त्यांच्यासोबत असलेले मजूर सचिन निकाळजे यांनी जीव वाचवण्यासाठी शेजारच्या विहिरीत उडी घेत जवळपास तासभर पाण्यात राहून स्वतःचा बचाव केला. या घटनेमुळे हल्ल्याची भीषणता स्पष्ट होते. सुरोशे यांच्या पश्चात मोठा परिवार असून, त्यांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.