जांभळीच्या झाडाखाली ‘आग्या मोहोळा’चा कहर; जेवण करतानाच महिलांवर भीषण हल्ला, चिमुकलीसह जनावरे जखमी!
Mar 19, 2026, 18:11 IST
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दुपारच्या निवांत क्षणी जेवणासाठी बसलेल्या महिलांवर अचानक मृत्यूचा सापळा कोसळावा, अशी थरारक घटना मेहकर तालुक्यातील प्रतापूर शिवारात घडली. जांभळीच्या झाडाखाली दबा धरून बसलेल्या ‘आग्या मोहोळा’ने अचानक हल्ला चढवत ५ महिला, एका ७ वर्षीय चिमुकलीसह जनावरांनाही गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रामनगर येथील रहिवासी विजय रामदास गिन्हे यांच्या शेतात दुपारी ३ वाजता ही घटना घडली. काम आटोपल्यानंतर अलका शिवाजी गिन्हे यांच्यासह महिला मजूर जांभळीच्या झाडाखाली बसून जेवण करत होत्या. मात्र, त्या झाडावर ‘आग्या मोहोळा’चे मोठे पोळे असल्याची कोणालाही कल्पना नव्हती. जेवण उरकून महिला उठताच अचानक मोहोळातील माशांनी आक्रमक होत थेट महिलांवर झडप घातली. क्षणातच भीषण गोंधळ उडाला. माशांचा हल्ला इतका तीव्र होता की महिलांना स्वतःचा बचाव करणे अशक्य झाले.
ओरडाआरडीत संपूर्ण शिवार दणाणून गेले. ही बाब लक्षात येताच विजय गिन्हे व इतर मजूर मदतीला धावले, मात्र माशांच्या थव्यामुळे त्यांनाही जवळ जाता येत नव्हते.
अखेर प्रसंगावधान राखत कचरा गोळा करून धूर करण्यात आला. धुराच्या साहाय्याने जीव धोक्यात घालून महिलांना शेतातील कोठ्यात हलवण्यात आले.
तब्बल पाऊणतास माशांनी कोठ्याभोवती वेढा घालून ठेवल्याने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली होती. अखेर अनेक ठिकाणी धूर केल्यानंतर माशा पांगल्या आणि मोठा अनर्थ टळला.
या भीषण हल्ल्यात अलका गिन्हे, लक्ष्मीबाई मोरे, वनिता देबाजे, मंगला कांबळे, लक्ष्मी इंगळे व ७ वर्षीय रिया इंगळे जखमी झाले. तसेच मदतीला धावलेल्या विजय गिन्हे व इतर मजुरांनाही माशांनी चावे घेतले. शेतातील गाय व तिचे वासरूही या हल्ल्यातून सुटले नाहीत. जखमींना तातडीने मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. ऐन उन्हाळ्यात शेतीकामाच्या गर्दीत घडलेल्या या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.