वारुळी येथे तुरीच्या सुडीस लावली आग; शेतकऱ्याचे ७० हजारांचे नुकसान...
वारुळी येथील शेतकरी चंदन सोनाजी पिसाळ यांनी गट क्रमांक १३ मध्ये सुमारे २ ते अडीच एकर क्षेत्रात तुरीची पेरणी केली होती. काढणी झाल्यानंतर तूर सांगून शेतातच गंजी (सुड्या) लावून ठेवण्यात आल्या होत्या. संबंधित कुटुंब हे मेंढीपालनाचा व्यवसाय करीत असून घरात वृद्ध आई असल्याची माहिती आहे.
रविवारी दुपारी अचानक त्यांच्या शेतातील तुरीच्या गंजीला आग लागल्याचे निदर्शनास आले. प्राथमिक माहितीप्रमाणे अज्ञात इसमाने मुद्दाम आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत संपूर्ण गंजी जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती ग्रामपंचायत सदस्य विशाल राजपूत यांनी दिली असून, शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पुढील कारवाईसाठी महसूल व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा करून चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
