मलकापूरात अग्नितांडव ! चारचाकी वाहनांसह स्पेअर पार्ट्स जाऊन खाक..!
Jan 21, 2025, 12:51 IST
मलकापूर ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) :मलकापूर शहरातील बुलढाणा रोडवरील सानिया कार गॅरेजमध्ये भीषण आग लागली या आगीत दुरुस्तीसाठी आलेल्या 10 ते 12 चारचाकी वाहनांसह सुमारे 10 ते 15 लाखांचे स्पेअर पार्ट्स जळून खाक झाले. काल २० जानेवारी रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास ही भीषण आग लागली.
मलकापूर बुलडाणा रोडवरील सानिया कार येथील गॅरेजमध्ये उभी असलेल्या स्विफ्ट डिझायर कंपनीच्या गाडीला अचानक मोठ्या प्रमाणात आग लागली. आजूबाजूच्या गाड्यांनाही आपल्या विळख्यात घेतले. गॅरेजमध्ये असलेले लाखोंचे स्पेअर पार्ट् ही या आगीत जळाले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आग इतकी भयंकर होती की ती विझवण्यासाठी तीन तास शर्तीचे प्रयत्न करावे लागले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमक विभागाला यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गॅरेजमधील वाहनांसह स्पेअर पार्ट्स जळाल्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.