ढालसावंगी येथे गोठ्याला भीषण आग; पशुधनासह शेतीसाहित्य जळून खाक; शेतकऱ्याचे पाच लाख ५० हजार रुपयांचे नुकसान...

 
धाड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतातील गाठ्याला आग लागून पशुधनासह शेतीसाहित्य जळून खाक झाले. ही घटना बुलढाणा तालुक्यातील ढालसावंगी येथे रविवारी मध्यरात्री घडली.या आगीत शेतकऱ्याचे जवळपास पाच लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 
ढालसावंगी येथील शिवाजी तुळशीराम खारडे यांच्या गट क्र. २७ मधील शेतात असलेल्या गोठ्याला रविवारी अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी गेला. या घटनेत गोठ्यातील एक बैल, गिरगाय, एक गोऱ्हे, तब्बल ९० कोंबड्या, दोन फवारणी पंप, दोन स्प्रिंकलर संच, एक मिनी स्प्रिंकलर संच, टीनपत्रे, शेतीऔजारे, जनावरांचे वैरण आणि टोकण पेरणी यंत्र आदी वस्तू जळून खाक झाल्या.घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी, तलाठी तसेच धाड पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला. आगीत नुकसानग्रस्त झालेल्या शेतकरी शिवाजी खारडे यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.