चिखली एमआयडीसीत नागवानी इंडस्ट्रीला आग! लाखोंचे नुकसान...

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :चिखली येथील एमआयडीसीतील नागवानी इंडस्ट्रीजला काल २१ मे च्या मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. या आगीत कंपनीतील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
 एमआयडीसी परिसरात चेतन नागवाणी यांचे नागवानी इंडस्ट्रीज नामक पत्रावळी, द्रोण आदी साहित्य निर्मितीची कंपनी आहे. या कंपनीत काल २१ मे च्या रात्री अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने कंपनीतील साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी चिखली व बुलढाणा नगरपरिषदेचे अग्निशमन दल दाखल झाले होते.
अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तत्पूर्वी कंपनीचे सुमारे १२ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रवीण जाधव, राहुल गवळी, पांडुरंग सोळंकी, तुषार गवई, शेख इस्माईल, अनुप खरे, सागर गवळी आदींनी परिश्रम घेतले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.