"कोथळी"त कौटुंबिक वादातून हाणामारी; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल....
May 16, 2026, 10:14 IST
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):तालुक्यातील कोथळी येथे कौटुंबिक वादातून एका कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाणे पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १४ मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
फिर्यादी बाळू सखाराम पाटोळे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील सखाराम पाटोळे हे मोठ्या मुलाच्या घरी जाऊन नातू धिरज पाटोळे याने घरातून बाहेर काढल्याची माहिती देत होते. त्यावेळी फिर्यादी व त्यांची पत्नी घराबाहेर उभे होते.
दरम्यान, फिर्यादीच्या पत्नीने “तुम्हाला कोणी बाहेर काढले?” असा प्रश्न विचारल्याने वादाला सुरुवात झाली. तक्रारीनुसार, सुपडा पाटोळे यांनी शिवीगाळ करत काठीने फिर्यादी व त्यांच्या पत्नीला मारहाण केली. तसेच रेखा पाटोळे, प्रवीण पाटोळे आणि प्रेम पाटोळे यांनीही फिर्यादीच्या पत्नीला चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भांडणाचा आवाज ऐकून घटनास्थळी आलेल्या फिर्यादीच्या दोन मुलींनाही ढकलाढकली करत मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी संबंधित चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.