वडिलांचा मृतदेह डोळ्यांसमोर... मित्राला शेवटचा फोन आणि पुढच्याच क्षणी मुलानेही घेतला टोकाचा निर्णय; बापलेकांच्या आत्महत्येने पारखेड हादरले...! घरी १८ एकर बागायती;कुटुंबही धार्मिक; मग अस काय घडलं?

 
 खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील पारखेड येथे घडलेल्या एका अत्यंत वेदनादायी घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे. वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पाहिल्यानंतर एकुलत्या एक मुलाने मित्राला फोन करून आपला निर्णय सांगितला आणि काही क्षणांतच स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुहेरी आत्महत्येमुळे गावात शोककळा पसरली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी संतोष हरिश्चंद्र गावंडे (वय ५० ) यांनी त्यांच्या शेतातील शेडमध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने त्यांचा मुलगा विठ्ठल गावंडे (वय ३०) शेतातील शेडमध्ये पोहोचला. तेथे वडिलांचा मृतदेह पाहताच त्याला जबर मानसिक धक्का बसला.
यावेळी विठ्ठलने गावातील एका मित्राला फोन करून, "माझ्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मी पण आता आत्महत्या करतोय," असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. मित्राने त्याला समजावण्याचा प्रयत्न करत, "असे काही करू नको, मी लगेच येतो," असे सांगितले. मात्र मित्र घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच विठ्ठलनेही गळफास घेऊन आत्महत्या केली.

संतोष गावंडे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या मालकीची सुमारे १८ एकर बागायती शेती आहे. संतोष गावंडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. गावंडे कुटुंब धार्मिक स्वभावाचे असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे कोणत्या कारणामुळे बाप-लेकाने एवढे टोकाचे पाऊल उचलले, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील ग्रामीण सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.