

मोटरसायकल गहाण ठेवली म्हणून बापाने केला लेकाचा खून; आता बापाला आयुष्यभर भोगावे लागणार कर्माची फळे; मेहकर तालुक्यातील पारडी ची घटना....
Mar 25, 2025, 20:16 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोटारसायकल गहाण ठेवली म्हणून बापानेच मुलाचा खून केल्याची घटना मेहकर तालुक्यातील पारडी येथे घडली होती. आता या घटनेतील न्यायालयीन सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने आरोपी बापाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे .आज,२५ मार्चला मेहकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने यासंदर्भातील निकाल दिला आहे. माणिकराव राठोड (रा. पारडी, ता.मेहकर) असे जन्मठेप झालेल्या आरोपी बापाचे नाव आहे..
ही घटना कोरोना काळातील २०२० च्या ऑक्टोबर महिन्यातील २० तारखेची आहे. आरोपी माणिक राठोड आणि मुलगा रवी राठोड वेगवेगळे राहत होते. वडिलांची मोटर सायकल रवी वापरत होता. रवीने मोटरसायकल गहाण ठेवलेली होती. या कारणावरून बापलेकांमध्ये सातत्याने वाद होत होता. घटनेच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता आरोपी माणिक राठोड याने लोखंडी रॉड मुलगा रवीच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रवीचा मृत्यू झाला होता. घटनेची तक्रार जानेफळ पोलीस ठाण्यात रविच्या भावाने दिली होती. त्यावरून माणिक राठोड विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
जानेफळ पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक मसराम यांनी घटनेचा तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र मेहकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. पोकळे, विशेष सरकारी वकील एस. एम. खत्री यांनी युक्तीवाद केला. माणिक राठोड वरील आरोप पुराव्यानिशी सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास ३ महिने कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सागर मुंगीलवार यांनी हा निर्णय दिला आहे.