सलून चालकावर जीवघेणा हल्ला; शिंदेसेना जिल्हा प्रमुखासह ७ जणांविरुद्ध गुन्हा 'तक्रार मागे घे' म्हणत कार अंगावर घातल्याचा, दुकानात घुसून मारहाणीचाही आरोप

 
 नांदुरा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहरातील तहसील कार्यालयासमोरील हिंदू जेन्ट्स पार्लरचे चालक तसेच भ्रष्टाचाराविरोधात सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करणारे अमोल गजानन सोनटक्के (वय ३५) यांच्यावर जुन्या तक्रारीचा पाठपुरावा थांबविण्यासाठी सात जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २७) दुपारी घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 या प्रकरणी नांदुरा पोलिस ठाण्यात शिंदेसेना जिल्हा प्रमुख संतोष शंकरराव डिवरे यांच्यासह अनोळखी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, अमोल सोनटक्के यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी महाळुंगी येथील संतोष शंकरराव डिवरे यांच्याविरुद्ध कथित मुरूम उत्खननाबाबत तक्रार केली होती. त्या तक्रारीचा ते सातत्याने पाठपुरावा करत असल्यामुळे तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींकडून यापूर्वीही धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

सोमवारी दुपारी अमोल सोनटक्के हे त्यांच्या सलूनसमोर उभे असताना, "तक्रार मागे का घेत नाही?" असा जाब विचारत आरोपींनी त्यांच्यावर कार घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर दुकानात घुसून त्यांना मारहाण करण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर अमोल सोनटक्के यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार शिंदेसेना जिल्हा प्रमुख संतोष शंकरराव डिवरे व अन्य सहा अनोळखी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.