भीषण अपघात; कुंभमेळ्याला जाणाऱ्या खामगावच्या भाविकांच्या कारला अपघात; कारचा चुराडा झाला; पण..सुदैव...देव आला धावून...!!

 
 खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाकुंभमेळ्यानिमित्त प्रयागराजला जात असलेल्या खामगावातील भाविकांच्या कारला बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास पारास जबलपूरनजीक भीषण अपघात झाला. या अपघातात जीवितहानी झाली नाही. कारमधील सर्व जण सुखरूप आहेत. या अपघातात कारचा अक्षरशा चुराडा झाला, मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही..त्यामुळे देवच धावून आला अशा प्रत्यक्षदर्शींच्या भावना होत्या...

 खामगाव येथील येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी नंदकिशोर लाहोटी, ललित राठी व रेल्वे स्टेशनसमोरील न.प. कॉम्प्लेक्समधील स्पेअर पार्ट विक्रेते विजय राठी हे कुटुंबासह प्रयागराजला जाण्यासाठी मंगळवारी रात्री ईरटिगा कारने निघाले होते. दरम्यान, आज पहाटे जबलपूरपासून ३० किलोमीटर अलीकडे त्यांच्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या समोरचा भाग पूर्णतः चकनाचूर झाला. पण, कारमधील सर्व ६ जणांचे दैव बलवत्तर म्हणून त्यांना फारशी इजा झाली नाही. यातील काहींना किरकोळ दुखापत झाली. अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.