राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; चार ठार, पाच जखमी; मलकापूर तालुक्यातील चिखली रनथम परिसरातील घटना..!

 
 मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अज्ञात वाहनाने चारचाकी वाहनाला दिलेल्या जोरदार धडकेमुळे भीषण अपघात झाला. या घटनेत तीन महिलांसह चार जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर, चिखली-रणथम परिसरात, बुधवारी (दि. १७) रात्री साडेअकरा वाजता घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रमांक एमएच ४६/एक्स ३१२० असलेली चारचाकी गाडी जळगावकडून नागपूरच्या दिशेने जात होती. दरम्यान मलकापूर तालुक्यातील चिखली रनथम परिसरात अज्ञात वाहनाने या वाहनाला जबर धडक दिली.
यामध्ये चार जण जागीच ठार झाले तर पाच जण जखमी झाले.
घटनास्थळावर एमआयडीसी पोलिस निरीक्षक हेमराज कोळी यांच्या नेतृत्वाखालील पथक दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह व जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हलवले. त्यापैकी चार गंभीर जखमींना जळगाव खान्देश येथे, तर एका जखमीला बुलढाणा येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, पोलिसांनी तात्काळ सुरळीत केली. रात्री उशिरा जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, नायब तहसीलदार श्रीकृष्ण उगले यांनी घटनास्थळ व उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. अज्ञात वाहनाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या अपघातातील मृतांपैकी चालकाची ओळख साजीद अजीज बागवान (वय ३०, रा. भुसावळ, जि. जळगाव खान्देश) अशी पटली आहे. मात्र, उर्वरित तिघी महिला प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नाही.