महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी महिलेला विजेचा धक्का; जागीच मृत्यू; लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांनी केला घात;अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी..!
Updated: Aug 22, 2025, 12:07 IST
संग्रामपूर (स्वप्निल देशमुख : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) लोंबकळनाऱ्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने शेतकरी महिलेचा जागीच मृत्यू झाला.ही घटना
तालुक्यातील दुर्गादैत्य शेतशिवारातील गट क्रमांक १०१ मध्ये २१ ऑगस्ट रोजी दुपारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली.
सुलोचना गजानन कारोळे (वय ५८) असे मृतक महिलेचे नाव आहे.दरम्यान महावितरणच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थानी केला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सुलोचना कारोळे या २१ ऑगस्ट रोजी
नेहमीप्रमाणे आपल्या शेतात शेतीच्या कामासाठी गेल्या होत्या. मात्र, शेतातील विजेच्या पोलवरून लोंबकळत असलेल्या तारेचा अचानक स्पर्श झाल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. त्यात त्या जागीच कोसळल्या व त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या हलगर्जी व बेजबाबदार कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. लोंबकळत असलेल्या तारांची पूर्वसूचना नसल्यामुळे ही दुर्घटना घडली, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनास्थळी पोलीस प्रशासनाने भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह पुढील तपासणीसाठी वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ही घटना वीज वितरण यंत्रणेच्या गंभीर दुर्लक्षामुळे घडली असून एक हकनाक जीव या अपघातात गमावावा लागला आहे.
आता तरी प्रशासनाने जागे होऊन अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी व उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांतून होत आहे.