शेतकरी महिलेला मारहाण भोवली; चौघांना प्रत्येकी ६ महिने कारावास व दंड...
Jan 31, 2026, 17:41 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जबरदस्ती शेतात ट्रॅक्टर घुसवून महिला शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या चार आरोपींना प्रत्येकी सहा महिन्यांची शिक्षा व दंड अशी शिक्षा मुख्य न्यायदंडाधिकारी बुलढाणा ए. ए. (अमित) खंडाळे यांनी सुनावली आहे.
बुलढाणा शहराजवळील येळगाव धरण परिसरातील महिला शेतकऱ्याने बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, २८ एप्रिल २०२४ रोजी आरोपी मच्छिंद्र पवार व त्याचे सहकारी फिर्यादीच्या शेतात ट्रॅक्टर घेऊन जबरदस्ती शिरले आणि नांगरणी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादी महिलेने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले तसेच जीवाने मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, घटनास्थळी कोथिंबीर खरेदीसाठी आलेल्या भाजीपाला व्यापाऱ्यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले. या प्रकरणात फिर्यादी महिला तसेच प्रत्यक्ष घटना पाहून हस्तक्षेप करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या साक्षी व इतर पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने निकाल दिला.
न्यायालयाने सर्व चार आरोपींना कलम ३२४ भादंवि अंतर्गत प्रत्येकी ६ महिने कारावास व २ हजार रुपये दंड, तसेच कलम ३२३ भादंवि अंतर्गत प्रत्येकी १ महिना कारावास व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील हितेश रहाटे यांनी कामकाज पाहिले, तर पैरवी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल विलास बंगाळे यांनी सहकार्य केले.
