अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी; चिखली तालुक्यातील करवंड शिवारातील घटना; परिसरात भीतीचे वातावरण...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतात काम करीत असताना अस्वलाने केलेल्या हल्ल्यात धोडप येथील एक शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना चिखली तालुक्यातील करवंड शिवारात ६ जानेवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उत्तम बळीराम परिहार (वय ५८) असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिहार हे धोडप गावचे रहिवासी असून, त्यांची शेती करवंड शिवारात आहे. मनोरुग्णांसाठी सेवा देणाऱ्या सेवा संकल्प संस्थेच्या पुढील भागात असलेल्या त्यांच्या शेतात ते नेहमीप्रमाणे काम करीत होते.
दरम्यान, शेतात काम सुरू असताना नाल्याकडून अचानक आलेल्या अस्वलाने परिहार यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. परिहार यांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी शेतकऱ्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विशेष म्हणजे, दीड महिन्यापूर्वी डोंगरशेवली परिसरात एका मेंढपाळावर अस्वलाने हल्ला केला होता. त्याचा उपचारादरम्यान काही दिवसांनी मृत्यू झाला होता. सातत्याने होत असलेल्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाने हिंस्त्र श्वापदांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.