विजेच्या धक्क्याने वानखेड येथील शेतकऱ्याचा मृत्यू; वीज कंपनीविरुद्ध थेट तामगाव पोलिसात तक्रार कार्यकारी अभियंता,उपकार्यकारी अभियंतासह वायरमनवर गुन्हा दाखल करण्याची मागणी!
Aug 2, 2025, 19:04 IST
संग्रामपूर (स्वप्नील देशमुख:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील वानखेड येथे घरासमाेर अवघ्या एक फूट अंतरावर असलेला धोकादायक वीज पोल जीवघेणा ठरला. २६ जुलै रोजी विजेचा धक्का लागून ६० वर्षीय शेतकरी राजेंद्र नरसिंगराव देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे देशमुख कुटुंब उघड्यावर आले असून त्यांच्या मागे वृद्ध आई-वडील, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. या प्रकरणी मृतकाचे भाऊ विनोद देशमुख यांनी खामगाव व संग्रामपूर विभागाचे कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता (वरवट बकाल) तसेच वानखेड गावातील वायरमन यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत लेखी तक्रार ३० जुलै रोजी तामगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी सदर तक्रारीची सा.ना.क्र. १५/२५ अन्वये स्टेशन डायरीवर नोंद घेतली आहे. तक्रारीत म्हटले आहे की , वानखेड गावातील वीज पोल व तारे अत्यंत बेफिकीर आणि निष्काळजीपणाने व्यवस्थापित करण्यात आले आहेत. रस्त्यालगतचे पोल गंजलेले असून कधीही तुटण्याच्या स्थितीत आहेत. तसेच विजेच्या जोडण्या अस्ताव्यस्तपणे लावण्यात आल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.२६ जुलै राेजी राजेंद्र देशमुख हे माकड हाकलत असताना त्यांच्या हातातील काठीचा स्पर्श विजेच्या प्रवाहीत तारेला झाला व त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.गावातील नागरिकांनी यापूर्वीही खामगाव व संग्रामपूर विभागीय अधिकाऱ्यांकडे पोल स्थलांतर व वायरिंग दुरुस्तीबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, वीज वितरण कंपनीकडून अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे हवालदिल झालेल्या देशमुख कुटुंबाला शासनाने तात्काळ आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.