सततची नापिकी आणि वाढत्या कर्जामुळे दिवाळीच्या दिवशीच शेतकऱ्याची आत्महत्या...
Oct 24, 2025, 13:16 IST
साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जामुळे शिंदी येथील ६५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ऐन दिवाळीच्या दिवशीच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.शिवाजी माणिकराव बुरकूल असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
२२ ऑक्टोबर रोजी दुपारी शिवाजी बुरकूल शेतात गेले होते. बराच वेळ झाला तरी ते घरी न परतल्याने मुलांनी शेतात जाऊन पाहणी केली. तेव्हा त्यांच्या जवळ कीटकनाशकाची बाटली पडलेली दिसली. तत्काळ त्यांना साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल परिहार यांनी परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना बुलढाणा जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.
ग्राम महसूल अधिकारी लखन राजपूत यांनी घटनेचा पंचनामा करून प्राथमिक अहवाल तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे पाठविला आहे.
मृत शेतकऱ्यांवर एका खाजगी पतसंस्थेचे सुमारे तीन लाख रुपये कर्ज होते. पतसंस्थेने वसुलीसाठी नोटीस बजावल्यानंतर ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. त्यातच यंदाच्या अतिवृष्टीमुळे शिंदी परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन शेंगांना कोंब फुटल्याने उत्पन्नाचे सर्व हिशोब बिघडले.कर्ज, नैसर्गिक संकट आणि शेतीच्या अपयशाने कंटाळून या शेतकऱ्याने आयुष्य संपवले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
