सततची नापीकी, वाढत्या कर्जाला कंटाळूनअल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; शिंदी येथील घटना, एक लाख रुपयांचे होते कर्ज...

 
 साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : येथून जवळच असलेल्या शिंदी गावातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १२ जानेवारी रोजी घडली. सुनिल उत्तमराव खरात (वय ४५ वर्षे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
शिंदी येथील सुनिल उत्तमराव खरात यांच्याकडे वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. ही शेती त्यांच्या आईच्या नावे असल्याने शेतीवर एक लाख रुपयांचे भारतीय स्टेट बँकेचे कर्ज होते. आईच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सुनिल खरात यांच्यावर आली होती. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन, मूग व उडीद ही पिके पूर्णपणे हातची गेली.
गेल्या अनेक वर्षांपासून घेतलेल्या कर्जावरील व्याज वाढत गेल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच खालावली. त्यातच दोन मुलांचे शिक्षण, घरखर्च व प्रपंच चालविणे कठीण झाले होते. या सर्व आर्थिक व मानसिक विवंचनेतून त्यांनी १२ जानेवारी रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे बीट जमादार नितीनराजे जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतक शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. सुनिल खरात यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.