रेती उपशाला विरोध केल्याने शेतकऱ्यास मारहाण; लिंगा (देवखेड) येथील खडकपूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उपशावरून वाद....
Jun 24, 2025, 10:22 IST
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):तालुक्यातील लिंगा (देवखेड) येथील खडकपूर्णा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उपशाला विरोध केल्याने एका शेतकऱ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रविवारी रवी सुभाष राठोड याच्याविरोधात किनगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी पवन जायभाये यांनी त्यांच्या शेतातून जाणाऱ्या मार्गावरून होणारी रेतीची वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्यांनी तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला होता. याचा राग मनात धरून आरोपी रवी राठोड यांनी गावातील एका दुकानात जायभाये यांना शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती मिळताच जायभाये यांनी याबाबत तहसीलदारांना तोंडी कळवले. त्यानंतर रविवारी अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. त्या आधारे किनगाव राजा पोलिसांनी राठोड यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली असून, खडकपूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उपशाविरोधात स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने तत्काळ कारवाई करून अवैध रेती उपसा थांबवावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.