बुलढाण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अमित नारडिया यांची आत्महत्या! राहत्या घरी गळफास घेत संपवले जीवन; सकाळी भावाने दरवाजा उघडताच धक्कादायक प्रकार समोर! आत्महत्येचे कारण अस्पष्ट....

 
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक तथा प्रकाश जनरल स्टोअर्सचे मालक अमित प्रकाश नारडिया (वय ४४) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. मलकापूर रोडवरील आपल्या निवासस्थानी त्यांनी जीवन संपवले. शहरातील व्यापारी वर्तुळात परिचित असलेल्या अमित नारडिया यांच्या अकाली निधनाने व्यापारी वर्गासह मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, अमित नारडिया हे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. घटनेची माहिती मिळताच आमदार गायकवाड यांनी तातडीने नारडिया यांच्या निवासस्थानी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित नारडिया हे शुक्रवारी रात्री आपल्या निवासस्थानाच्या सर्वात वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये एकटेच झोपले होते. मात्र, शनिवारी सकाळी वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यानंतर त्यांचे बंधू आशिष नारडिया यांनी बेडरूमची खिडकी तोडून आत प्रवेश केला असता अमित हे पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. सकाळी सव्वाआठ वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने कुटुंबीयांना जबर धक्का बसला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.

दरम्यान, अमित नारडिया यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल नेमके का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या मृत्यूमागील परिस्थितीबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसून, कोणत्याही कारणाचा अंदाज बांधणे सध्या घाईचे ठरेल. शहरातील परिचित आणि अनेकांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या व्यावसायिकाच्या अशा अकाली निधनाने बुलढाण्यात हळहळ व्यक्त होत आहे.