बुलढाण्यातील गॅस वेल्डिंग दुकानात भीषण स्फोट; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!
Nov 10, 2025, 11:49 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागे असलेल्या ‘अरबाज गॅस सर्व्हिस’ या वेल्डिंग दुकानात ९ नोव्हेंबर रोजी सकाळी सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेत सुमारे ₹५० ते ₹६० हजारांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बसस्टँड परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागील भागात काही गॅरेजची दुकाने आहेत. त्यापैकीच एक ‘अरबाज गॅस सर्व्हिस’ नावाचे दुकान आहे. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजेदरम्यान वेल्डिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला, ज्यामुळे दुकानाला त्वरित आग लागली.
यावेळी अज्ञात व्यक्तीने दुकानावर टायर फेकल्याचीही माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी काही वेळातच आग नियंत्रणात आणली.
या घटनेत दुकानमालक शेख मेहबूब यांचे सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले असून पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
