EXCLUSIVE कोण धुतल्या तांदळासारखा? मग रेतीवाले मोकाट सुटतातच कसे?

 
कलेक्टर साहेब....हा घ्या पुरावा! महसुल प्रशासन गप्प का? कुछ तो गडबड है! मंडपगाव, सुलतानपूर परिसरातील प्रकार....
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "जिल्ह्यात कुठेही अवैध रेती वाहतूक सुरू नाही.महसूल प्रशासन आणि पोलीस विभागाकडून वेळोवेळी कारवाया करण्यात येतात.." असं ठरलेलं उत्तर महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी देत असतात..अर्थात खरं काय हे त्यांनाही माहीत असतंच...मात्र आपण "धुतल्या तांदळासारखे" आहोत हे दाखवण्याची केविलवाणी धडपड काही अधिकारी करत असतात.. खडकपूर्णा प्रकल्पातून तर मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन आणि वाहतूक होते, मात्र रेतीमाफिया ना पोलीसांच्या हाती लागतात ना महसूल वाल्यांच्या...अर्थात पोलीस आणि महसूल प्रशासनाने जर ठरवलंच तर एकाही टिप्परवाल्याची रेती वाहतूक करण्याची हिम्मंत नाही..पण मनावर घेणार कोण? तर असो..बातमीत जे व्हिडिओ आहेत ते इसरूळ भागातील आहेत, जिथे दिवसा देखील टिप्पर वाले सुसाट सुटले आहेत..
देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्प हा रेतीमाफीयांचा अड्डा बनला आहे. मंडपगाव, इसरुळ, शेळगाव आटोळ, देऊळगाव घुबे, मलगी या रस्त्यावरून रात्रभरात जवळपास ८० ते ९० टिप्पर चालतात. त्यामुळे या रस्त्याची पार दुर्दशा झाली आहे.. रेतीमाफिया एवढे मुजोर झाले आहेत की, "आमचं कुणीही काहीही वांकड करू शकत नाही" अशा थाटात ते वावरतात.एवढा कॉन्फिडन्स रेतीमाफियांना येतो तरी कसा? त्यांना कुणाचा छुपा आशीर्वाद आहे? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे..
काही दिवसांआधी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भूतेकर यांनी रेतीमाफीयांच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्यावरच खंडणीचे गुन्हे देखील दाखल झाले. अधिकारी "वेळोवेळी आता कडक कारवाई करू, पथक गस्तीवर ठेवू "असा शब्द देतात मात्र कधी कधी तर गस्तीवर असणाऱ्या पथकांच्या डोळ्यादेखत देखील टिप्परवाले सुसाट सुटतात..त्यामुळे "कुछ तो गडबड है.." असं सामान्यांना वाटत असेल तर त्यात चूक काय?