EXCLUSIVE"त्या" मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दाखवला होता हिसका! गुलाबराव खरात तशी कारवाई करतील का? वर्षानुवर्षे एकाच टेबलला चिकटलेल्या गोचिडांवर कारवाई काय....
Sep 16, 2025, 12:50 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय..बातमी बुलडाणा जिल्हा परिषदेशीच संबंधित आहे. जिल्हा परिषदेतील काही टेबलांवर म्हणजे "कामाच्या" टेबलांवर तीच ती माणसे आहेत. जनावरांच्या अंगावर चिटकणाऱ्या गोचिडांप्रमाणेच ती माणसे त्या त्या टेबलांना चिटकलेली आहेत..
"संकलनाचा" अनुभव असल्याने साहेब कोणताबी येवो त्यात बदल काही होत नाही. जिल्हा परिषदेच्या "त्या" लफडेबाज अधिकाऱ्याच्या कार्यालयातही तसेच आहे..आता "तो"अधिकारी कोण हे आता अख्या जिल्ह्याला माहीत झालेलं आहेच.१५० समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांकडून प्रति अधिकारी १००० घेणारा तोच, फ्लॅट मारहाण प्रकरणातील तोच, अधिनस्त महिला कर्मचाऱ्याला अश्लील मेसेज पाठविणारा तोच.. हो, तोच..ज्याला "प्रेमाची गीते" आवडतात, तोच तो..आणि या अधिकाऱ्याच्या कार्यालयात असणारे पवार आणि हिवाळे नामक दोन "कलेक्ट–कर" अगदी तसेच आहेत, टेबलांना चिटकलेले...आता या दोघांच्या तक्रारी एवढ्या वाढल्यात की त्यावर कारवाई अपेक्षित आहेच..
याआधी अशी हिंमत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन यांनी दाखवली होती. पवार याला ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात तर त्याच्या तेव्हाच्या ताठे नामक सहकाऱ्याचे डायरेक्ट निलंबन केले होते.
मुद्दा असा आहे की जे
षण्मुखराजन यांनी केले ते सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात करतील का? खरात यांनी कारवाई केली तर त्यांना पारदर्शक म्हणता येईल...अन्यथा त्या दोघांच्या संकलनाचा वाटा खरात यांच्यापर्यंतही पोहोचतो असे कुणी म्हटले तर म्हणणाऱ्यांच्या तोंडाला हात लावता येणार नाही...
षण्मुखराजन मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना देखील या विभागात असा भ्रष्टाचार वाढला होता. तेव्हा पवार आणि ताठे नामक "कलेक्ट–कर" जबाबदारी पार पाडत होते. षण्मुखराजन यांच्या कानावर हा विषय पडताच त्यांनी ताठे याचे निलंबन केले तर पवार याला ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात पाठवले होते.षण्मुखराजन यांची बदली झाल्यानंतर भाग्यश्री विसपुते यांच्या कार्यकाळात पवार याने पुन्हा तो टेबल मिळवण्यासाठी जंग जंग पछाडले..मोठी तडजोड करून पुन्हा तो टेबल मिळवला, तेव्हापासून पुन्हा त्याच जोमाने संपूर्ण जिल्हाभरातील कलेक्शन सुरू आहे.
साहेबांकडून कोणतेही काम करून घ्यायचे असेल तर पवार किंवा हिवाळे मार्गेच जावे लागते हा या कार्यालयातील अलिखित नियमच झाला आहे. मुळात या कलेक्ट करांना तोच टेबल एवढा का प्रिय आहे? हा महत्त्वाचा प्रश्न आहेच..त्यामुळे ज्या पद्धतीने षण्मुखराजन यांनी कलेक्ट करांचा करेक्ट कार्यक्रम केला होता तसा गुलाबराव खरात करतील का? राहिला विषय त्यांच्या साहेबांचा तर तो कार्यक्रमही लवकरच होईल असे वरिष्ठ स्तरावरील संकेत आहेत...